फाटली पँट - Sinto आला धावून! | MIT WPU मधील एक गमतीदार किस्सा



"पँट फाटली, पण मित्राने इज्जत वाचवली!" – एक विसरता न येणारा किस्सा 😄👖

B.Ed. चं पहिलं वर्ष नुकतंच सुरू झालं होतं.
दिवस होता १६ जानेवारी, २०२५ आणि मी दौंडहून पहाटे लवकर उठून निघालो होतो – रोहिडा किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी. सगळी तयारी झाली होती. उत्साह भरपूर होता.

दौंडहून DEMU गाडीने पुणे स्टेशन मग तिथून मेट्रोने पुढचा प्रवास...

पण... पुण्याच्या जवळ येताच एक गोष्ट लक्षात आली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली!

पुण्याजवळ पोहोचताना लक्षात आलं की मी जी पँट घातली होती, ती मागून जबरदस्त फाटलेली होती!

इतक्या सकाळी दुकानं बंद. ट्रेकचं ठिकाण दूर. आणि मनात एकच विचार – "आता काय करायचं? कुठे लपायचं?"

शेवटी ठरवलं, आता माघार नाही...

इकडे तिकडे गेलो तर उशीर होणार आणि ट्रेक मिस होणार... त्यात ट्रेकची अतिशय जास्त आवड असल्याने आणि पैसे भरल्यानेही मला हा आनंद काही केल्या सोडायचा नव्हताच!

ट्रेनमधून उतरतानाही मी अगदी सावध होऊन चालत होतो – कुठे काही उघडं पडायला नको! कारण हे पुणं शहर – इथे कोणीतरी ओळखणारा नक्कीच भेटणार, आणि सगळी दुनिया हसणार!

मग काय? एकच उपाय सुचला – "मित्र!" 🙏

माझ्या डोक्यात एक नाव चमकलं – Sinto – केरळहून आलेला, MIT-WPUमध्ये शिकणारा माझा वर्गमित्र.
मी लगेच त्याला WhatsApp केला:
"एखादी ट्रॅक पँट असेल का? आणू शकशील का विद्यापीठाजवळ?"

मी काहीच कारण सांगितलं नाही. फक्त माझी गरज आणि थोडीशी आशा.
थोड्याच वेळात त्याचं उत्तर आलं – "ok."
तेव्हा कुठे जीवात जीव आला.


पण, "ok" नंतर काय?

खरच त्याच्याकडून मदत होणार आहे का? त्याला फोन लावू का? तो खरच आणेल का? असेल का त्याच्याकडे? पुन्हा मॅसेज करू का?

अनेक प्रश्न आणि विचार येत होते...

संपूर्ण पुणे ते मेट्रो प्रवास तसाच केला त्यात वारंवार मी पहायचो की काही दिसायला किंवा कळायला नको लोकांना!

अगदी जीव मुठीत धरून प्रवास केला...

मेट्रोतून उतरल्यावर .. आनंद नगर मेट्रो स्टेशन ते कॉलेज पायीच वाट आहे... जरी सकाळची वेळ असली तरी एवढं पायी चालणे! म्हणजे, चालताना जर आणखीनच वाईट अवस्था झाली तर?!

पण...

अचानक मला पाहून काही माझ्याही आधी आलेल्या मित्रांनी आवाज दिला... चहा पिण्यास... त्यात मुलीही होत्याच...

पण त्यांना मी काहीही कळू दिले नाही!

कसंबसं सांभाळून घेतलं... नशीब, कोणाला माझ्या सांभाळून चालण्यावर संशय नाही आला! आला असल्यास पाठीमागे चर्चा केली असावी, पण, सर्वांसमोर थेट नाही विचारलं ते बरं झालं!

अशा मनाच्या अवस्थेत मी फसलो असताना...

विद्यापीठाच्या गेटवर Sinto स्वतः आला. बाजूला नेलं आणि शांतपणे सांगितलं – "पँट आणली आहे."
सिक्युरिटीवाल्यांना विचारून आम्ही दोघं गुपचूप सिक्युरिटी कॅबिनमध्ये गेलो आणि मी तिथे “ऑपरेशन पँट एक्सचेंज” यशस्वी केलं!

ती एक छोटीशी मदत त्याच्यासाठी काहीही नसेल,
पण माझ्यासाठी – एक अख्खी इज्जत वाचली होती!
लोक ट्रेकच्या आठवणी म्हणून फोटो घेतात, मी मात्र त्यादिवशी "क्लीन चेंज" झालो म्हणून खुश होतो!


पण हे सगळं आठवलं आज अचानक का?

आज तारीख – ३ जुलै, २०२५!
मागच्याच २९ जूनच्या पहाटे मी माझा एकप्रकारे नात्याने भाऊ लागणारा विद्यार्थीमित्र स्पर्श जाधव याच्यासोबत शिर्डीला SWISH दुचाकीवर गेलो होतो. या गाडीची अवस्था फारच बिकट झाली आहे.. तरी कमाल आहे तिची... अनेक प्रसंगांची साक्षीदार आहे ती! 
त्या दिवशी पहाटे प्रवासात असताना एका किरकोळ अपघातात माझी फॉर्मल पँट पुन्हा फाटली! लागलेही मला पण प्रवास मोठा असल्याने थांबणं शक्य नाही. दृढ निश्चय केला आहे तर पूर्ण झालाच पाहिजे प्रवास...
तेव्हा पँट सांभाळतच दिवसभराचा कार्यक्रम पार पाडला – कारण एक ठरवलं होतं, जग काहीही फाटू दे – मी ठरवलेलं पूर्ण करणारच!

नंतर मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर नवी पॅन्ट विकत घेऊन पुढच्या गोष्टी सांभाळल्या!

आज सुकलेले कपडे दोरीवरून काढत असताना ती शिर्डीच्या प्रवासात झालेल्या अपघातात फाटलेली पॅन्ट दिसली.मी मम्मीला विचारलं – "ही फाटलेली पँट काय करू?"
मम्मी म्हणाली, "टाकून दे, काय उपयोग आता तिचा?"
आणि त्या वाक्यावरून मला रोहिडा ट्रेकच्या दिवशी फाटलेली पँट आणि Sinto चा देवदूतासारखा मदतीचा हात आठवला.

ती पँट अजूनही कपाटात पडून आहे – पण ती एक फाटकी कपड्याची वस्तू नाही, तर आठवणींनी भरलेला क्षण आहे.


शेवटी काय?

कधी पँट फाटते, कधी परिस्थिती – पण खरा शिल्पकार तोच, जो त्या क्षणीही डगमगत नाही.

Sinto साठी तो प्रसंग कदाचित छोटा असेल. पण माझ्यासाठी – जगाच्या नजरेतून वाचवणारा एक सोन्यासारखा मित्र!
त्याच्यासाठी ही पोस्ट – एक छोटीशी आठवण, आणि एक मोठा "थँक्स!"


आता पुढचं वळण – शिर्डी ट्रिपचे किस्से आणि त्या "अकार्यक्षम आणि बुद्धिहीन आयोजकांची" गोष्ट... ती पुढच्या पोस्टमध्ये! 😄



Comments