January 14, 2019

मी भारतीय! | ARJ Daund

मी भारतीय!
होय, प्रथमच खूप वर्षांनंतर ब्लॉग लिहीत आहे आणि ते सुद्धा "मी भारतीय" या शिर्षकाचे पोस्ट लिहून पुन्हा नव्याने सुरुवात करून!
गेली अनेक वर्षे (ब्लॉग लिहिण्याचे सोडल्यापासून) मला वेगवेगळे अनुभव येत राहिले आणि याच अनुभवातून तसेच गुगल, विकिपीडिया यांवर मिळणाऱ्या, आणि ऍमेझॉनवरून खरेदी केलेल्या पुस्तकांतून प्राप्त झालेल्या ज्ञानातून तसेच विविध उपक्रमांत सहभाग नोंदवून व आपले विचार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मांडून आणि विविध प्रकारचे काम (नोकरी/व्यवसाय) करून मिळालेल्या अनुभवांतून मी आणखी घडत गेलो आणि आजही घडत आहे! युट्यूबच्या माध्यमांतून ऐकलेली वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या असामान्य विशेष लोकांचे वक्तृत्व, तसेच इतिहासातील भाषणे आणि मग स्वतः त्याच्यावरून केलेली टिपणी अथवा मताची मांडणी (स्वतःच्या युट्युब वाहिनीवर!) आणि त्यावरून माझ्यावर होणाऱ्या टीका आणि गैरसमज - चाहते आणि शत्रू! महाविद्यालयीन जीवनात गैरसमजातून होणाऱ्या टीका आणि बदनामी यांचा गैरफायदा घेऊन तसेच सत्याच्या बाजूने नेहमी लढून काही वेळेस याचा गैरफायदा काही कपटी लोकांनी घेतला आणि पुन्हा बदनामी आणखी जोरात करण्याचा कटही आखला! अशातही काही लोकांशी वाद घालून आणि काही माणसांचे गाल आणि पाठ रंगवून पुन्हा त्यांच्याशी मैत्री करणे असेही अनोखे अनुभव येणे हे तर अजबच म्हणावे! व्हाट्सअप्पवर आणि फेसबुकवर नेहमीप्रमाणे शब्दांचे फटके देऊन अव्यवस्थेला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न असेल किंवा एखाद्या राजकीय नेत्याचे विचार पटले तर त्याचे समर्थन केल्यावर होणाऱ्या टिकांचा आणि तिरस्कारांचा वर्षाव असेल किंवा मी काहीच करत नाही माझ्या आयुष्यात काहीच घडले नाही आणि मी दुसर्यांना कसले ज्ञान देतो अशा प्रकारच्या अगदी नीच पातळीच्या अवैचारिक टीका असतील - या सर्वांना मी सामोरे गेलो! काही मोठ्या लोकांबरोबर वेळ घालवण्याचे प्रसंगही आले! वयक्तिक जीवनात तर बरेच काही हरवले तर बरेच काही मिळवले सुद्धा! माझ्या स्वभावाला समजणे कठीण आहे कारण आपण मला ओळखण्यासाठी कधी त्या दृष्टिकोनातून पहिलेच नाही. "त्या दृष्टीकोनातून" म्हणजेच तुम्ही दुसऱ्याबाजूने विचार करीत नाही आणि इथेच मार खाता!
आज मी केवळ सुंदर विचारांमुळेच माझे अस्तित्व निर्माण केले आहे. होय, हेच सत्य आहे कारण "ARJ Daund" हे नाव उदयास कसे आले असा जर आपल्याला पडलेला प्रश्न असेल तर वरील वाक्यातच याचे उत्तर आहे हे मी सांगेन. मी खरं तर चारही बाजूने व्यवस्थित विचार करणारा माणूस आहे परंतु जगात माझ्यासारखी लोकं थोडीच आहेत - आमच्या सारख्यांचा शोध घेणे म्हणजे प्रचंड कठीण काम आहे आणि मग पुन्हा प्रश्न पडतो "चारही बाजूने विचार म्हणजे नेमकं काय?" आणि याचे उत्तर द्यायला मी नेहमीच तयार! अनेक वेळा काय होता की एखादा माणूस एका विचाराचे समर्थन करीत असतो तेव्हाच दुसरीकडे दुसरा माणूस दुसऱ्या एका विचाराचे समर्थन करीत असतो. आणि हे दोन्ही विचार फारच वेगळे आणि काही प्रमाणात किंवा संपूर्णतः एकमेकांचे विरोधी असतात. अशात पहिला माणूस स्वतःच्या विचारांवर ठाम असतो तर दुसरा माणूस आपल्या मतावर ठाम असतो आणि ते एकमेकांचे एकही मत ऐकण्यास वा मान्य करण्यास तयार नसतात. असेच काहीसे राजकारणात असते आणि त्यालाच मग पुढे जाऊन "डावे" आणि "उजवे" असे संबोधले जाते. परंतु जर यांच्यापैकी एकाला "बरोबर" ठरवायचे असेल तर यांचे वाद मिटवण्यासाठी आणि "योग्य" विचाराची निवड करण्यासाठी एक मध्यस्थी परंतु अतिशय हुशार व्यक्तीस नेमले पाहिजे. असेच काहीसे न्यायालयात असते. मग दोन्ही बाजूचे विचार ऐकून कोण योग्य आहे याचा निकाल देणे अथवा योग्य न्याय मिळवून देणे हे त्या मध्यस्थी व्यक्तीचे काम बनते! ती व्यक्ती अपक्षपणे कार्य करते आणि तिचा इतर दोघांशी कोणताही संबंध नसतो. यातूनच आपल्या लक्षात येईल की न्यायालयात असणारे न्यायाधीश हे ज्या प्रकारे विचार करतात त्याला "चारही बाजूने विचार करणे" असे म्हणता येईल! आणि अशाच प्रकारचा विचार मी करीत असतो. अर्थात असंख्य विचारांतून योग्य त्या विचारांची निवड करून त्या योग्य विचारांना आत्मसात करणे आणि समाजात बदल घडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा या प्रकारे विचार करण्यामागचा हेतू! पण खरं सांगा वाचकांनो, अशाप्रकारे विचार करणारी लोकं आहेत का ओ समाजात! अतिशय नगण्य संख्या आहे अशा माणसांची! "चारही बाजूने विचार करणारी" माणसे माझ्या मते अत्यंत बुद्धिमान, हुशार, चतुर आणि समंजस असतात. आणि अशी लोकं पुढे आयुष्यात अशी प्रगती करतात की त्यांच्या त्या प्रगतीची तुलना इतर कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीशी केली जाऊ शकणार नाही. अशाच लोकांच्या स्वभावाचा अभ्यास करून त्यावरील विश्लेषण मी एका पुस्तकाच्या माध्यनातून पुढे आणणार होतो पुस्तक लिहण्यास सुरूही केले होते एवढेच काय तर मी जाहीर सुद्धा करून बसलो होतो की मी पुस्तक बाजारात आणीत आहे परंतु जेव्हा मला समजलं की पुस्तक प्रकाशित करणे काही सोप्पे नसते (पैसे खूप लागतात) आणि ते सध्या तरी अशक्य आहे तेव्हा विषय जरा बाजूलाच ठेवला आणि हळूहळू अनुभवातून हेही लक्षात आले की पुस्तक जरी छापले तरी त्याची विक्री होणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि पुस्तकांची विक्री हि सहज होत नाही - एक तर पुस्तक विकत घेणाऱ्यांची तयारी असली पाहिजे, पुस्तकप्रेमींचा शोध घ्यावा लागणार किंवा मग सर्वात कठीण - पुस्तक वाचण्याचा लळा लोकांना लावणे! एवढे करण्यापेक्षा नंतरच पाहू त्याचं!
आता वळतो मुख्य विषयाकडे -
"मी भारतीय" असे शीर्षक का?
माझ्या वक्तीमत्वाचं विशेषण वरील प्रमाणे सांगितल्यानंतर त्याच्याच अनुषंगाने आलेल्या काही प्रसंगांचे वर्णन व माझे नेमके विचार स्पष्ट करण्याच्या हेतूने आणि काही गैरसमजुतींना आळा घालण्यासाठी हे शीर्षक दिले आहे. याचा संबंध थेट "भारतीय" या शब्दाशी नक्कीच आहे कारण अलीकडे मी "भारतीय संस्कृतीचा पुरस्कर्ता" म्हणून ही ओळख निर्माण केली आहे असे असताना मात्र काही गैरसमज पसरत असून त्यातून काहींना त्यांच्या विचारसरणीचा अपमान अथवा मी भरकटत चाललो आहे याची काळजी सुद्धा वाटू लागली आहे. जेव्हा मी "भारतीय" या शब्दाचा उल्लेख करतो तेव्हा मी अखंड भारताचा विचार करतो आणि त्यात कुठच्याही एका धर्म किंवा जातीचा उल्लेख करीत नाही. खरं तर मी आपल्या देशाच्या संस्कृतीचं महत्वच सांगत आहे - अर्थात विचार, परंपरा, संस्कृती, भाषा अशा विविध गोष्टीत विविधता असूनही राष्ट्रीय पातळीवर मात्र एकता, शांती आढळून येते असा आपला देश आहे! मग भारतीय म्हणत असताना मी मधेच "हिंदू धर्म" कुठून आणीत असतो? आणि हि दुहेरी भूमिका तर नाही ना? असा सवाल आपणांस पडत असेल तर त्याचे उत्तर हेच देईल कि "धर्माचा स्वाभिमान" सुद्धा तितकाच महत्वाचा वाटतो मला! आपण जरा इतिहासाची पाने चाळा म्हणजे आपल्या लक्षात येईल की भारताला "हिंदुस्थान" म्हणत होते आणि का म्हणत होते त्याचे देखील उत्तर आपणास मिळेल! परंतु म्हणून मी काही इतर धर्मांचा द्वेष करीत बसत नाही मात्र जे सत्य आहे ते सत्य आहे आणि राहणार! मग वाईट काय त्यात! मी इतर धर्मांचा मान ठेवतो, त्यांचा द्वेष करीत नाही आणि "भारतीय" असल्याचा अभिमानही बाळगतो मग माझे चुकतेच कुठे?! आज जर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले नसते तर आपले काय हाल झाले असते याचा विचार करावा...
आपल्या मातृ भाषेचा, आपल्या धर्माचा अभिमान प्रत्येक तरुणाला असावाच असेच मला वाटते - मी तर म्हणेन की तोच खरा भारतीय आहे जो आपल्या मातृभाषेचा आणि आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगतो!
केवळ हिंदू धर्माबद्दल बोललं कि मी RSS किंवा BJP वादी होत नाही तसेच इतर धर्मांचे कौतुक केल्याने मी काँग्रेसी होत नाही!
आपले विचारच मर्यादित असल्यावर आपल्याला काय कळणार आमचे विचार!
त्याही पुढे जाऊन जर भारतामध्ये कोणत्याही इतर धर्मामध्ये तेथील चुकीच्या परंपरेमुळे कोणाला हानी होणार असेल तर एक भारतीय नागरिक म्हणून माझे कर्तव्य बनते त्या परंपरेला मोडून काढण्याचे! इतिहास पाहाल तर लक्षात येईल की हिंदू धर्मातील सुद्धा अनेक वाईट आणि चुकीच्या परंपरांना काढून टाकण्यात आले आहे...
"मी भारतीय" आहे आणि राहणार मात्र माझे "भारतीयत्व" "हिंदुत्व" विचारांना सोडून नाही तर सोबत घेऊन आहे कारण माझा स्वभाव, माझे अस्तित्व हे लहानपणी आईने शिकवलेल्या "शुभं करोति" ने बनलेले आहे!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment

THINK THRICE BEFORE COMMENTING. YOUR WORDS MIGHT HURT PEOPLE.