April 21, 2019

२०१९ ला बारामती कोणाची? | ARJ Daund

२०१९ च्या लोकसभा निवणुकीत अर्थात १७वी लोकसभा  स्थापन करण्यासाठीच्या निवणुकीत अनेक नवीन बदल आणि गमतीजमती पाहायला मिळाले आहेत. विशेषकरून २०१४ नंतर ह्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरात फार मोठ्या संख्येने वाढ झालेली दिसून येत आहे. २०१४ नंतर नेते ट्विटर चा वापर करू लागले आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. त्यातच २०१९ मध्ये "चौकीदार" या शब्दाने तर सर्वच भारतीयांना वेड लावले आणि सोशल मीडियावर कोणी #ChowkidarChorHai तर कोणी #ChowkidarPhirSe सारखे हॅशटॅग वापरून आपल्या नेत्याची बाजू घेऊ लागला...
अशातच जसेजसे निवडणुकीचे वारे सुरु झाले तसे तसे महाराष्ट्रातील विरोधकांची चांगलीच दमछाक झाली! अनेक दिग्गज नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करू लागले! त्यात सर्वात जास्त कोंडी झाली ती पवारांची कारण त्यांनी ज्यांना तिकिटे दिली ती कदाचित त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पचनी पडली नाही आणि मग काय? टीका करणे सुरू आणि पक्ष हि बदलणे चालू! देशातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष बनला आहे आज भाजपा.
आता मुख्य विषयाकडे! बारामती मतदारसंघ हा पवार घराण्यासाठी आणि खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो... २०१४ मध्ये हे मोडून काढण्याचा प्रयत्न महादेव जानकर यांनी केला परंतु काही फरकांनी अपयश आले... (माफ करा पण मी माझ्या या लेखात कुठलेच आकडेवारी दिलेले नाहीत आणि कोणताच संदर्भ दिलेला नाही कारण हा लेख केवळ माझे वयक्तिक मत मांडण्यासाठी आहे) २०१९ ला मात्र दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नीने विद्यमान खासदार तसेच लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले...
सौ. कांचन ताई कुल!
कांचन ताईंना बिजेपीतून थेट तिकीट मिळाले...
बीजेपी आणि शिवसेना यांची युती आहे...
शिवसेनेचे आमदार असलेले तालुके सुद्धा बारामती मतदारसंघात आहेत.. आणि आमदारांच्या पत्नी तसेच दौंडचा उमेदवार आणि मोदी लाट असे काही जबरदस्त मुद्दे कांचन ताईंच्या बाजूने!
त्यात जेव्हा आम्हाला समजते कि या मतदारसंघातून तब्बल १८ उमेदवार उभे आहेत तेव्हा आम्हाला खरा प्रश्न हा पडला की लढत या दोन ताईंमध्येच मजबूत होणार आणि लोकांना इतर उमेदवारांची नावे सुद्धा अजून माहिती नाही मग हे उभे राहिलेत तरी कशाला?!
२ ताई सोडल्या तर यातलं बसपा , वंचित बहुजन आघाडी आणि शिवाजी नांदखिले हे काहीसे परिचित आणि यांना काही मते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही...
बसपा च्या उमेदवार बद्दल काहीच माहिती अद्याप मला तरी झालेली नाही आणि तशी चर्चा हि ऐकीवात नाही...
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार नवनाथ पडळकर यांना मी एकदा ऐकले आहे... त्या व्यतिरिक्त या पक्षाचा प्रचार करणारे आणि मत देणारे संख्येने चांगले आहेत कारण हा पक्ष थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश यशवंत आंबेडकर अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांचा आहे!
शिवाजी नांदखिले तर अनेक वर्षांपासून उभे राहतात पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही.. शिवाजीरावांना प्रथम मी ऐकले ते दौण्ड कॉलेजच्या माध्यमातून भरवल्या शिबिरात! (बोरिबेल येथे) तेव्हा मी एकट्यानेच त्यांना प्रश्न केला होता की, "आपल्याला जेल जावं लागलं? का?". संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर मला काही मुले "शेतकरी संघटनेचे नेते" म्हणू लागले होते! असो.
यांच्या व्यतिरिक्त कोणीच तेवढा प्रभावशाली नाही आणि परिचित सुद्धा नाही!
म्हणून मी म्हणत आल्याप्रमाणे ही लढत केवळ जुनी ताई आणि नवीन ताई यांच्यातच आहे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोडले आणि दौंड शहराला सोडले तर ग्रामीण भागात आणि विशेषकरून संपूर्ण बारामती मतदारसंघातील महिलावर्गात जुन्या ताईने चांगलेच स्थान निर्माण केले आहे.
नवीन ताई ला अनुभव नाही अशी सुद्धा मतदारांची भावना आहेच!
मग मोदींच्या नावाने मत मागणाऱ्या ताई बारामती जिंकतात कि केलेल्या कामांच्या आधारे मत मिळवून जुन्या ताई आपला गड राखतात हे पाहणे गरजेचे!
काय झालं?
माझं मत? ते जुन्या ताईला! नवीन ताईला असतं जर त्या कोणत्या घराण्यातून नसत्या आणि थोडा फार अनुभव असता तर! तसा मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही बरं का!
मतदानाचा हक्क १००% बजवा! ऑल दि बेस्ट! :-)

April 20, 2019

बाबा हरवले - कायमचेच...

Baba Death Event Story I
काही दिवसांपासून मी थोडा स्वमग्न झालो होतो अर्थात केवळ स्वतःच्याच कामात गुंतलेलो होतो...
नव्यानेच सुरु केलेल्या "रॉयल स्पोकन इंग्लिश" ला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे हे लक्षात आले होते परंतु अनेकांना खोटे बोलून २०० - २५० विद्यार्थी आहेत असे सांगण्यास सुरुवात केली होती. असे असताना सुद्धा प्रतिसाद मिळेनासा झाला होता आणि मी त्या टेन्शन मध्ये असतानाच मला कॉलेजमधले वेगवेगळे टेन्शन होतेच! अशात जेव्हा मी घराकडे कमी लक्ष देत होतो आणि बाहेर जास्त पळत होतो तेव्हा माझ्या हे लक्षात आलेच नाही की मी घरच्यांसोबत दोन शब्द बोलत नाही म्हणून ते दुखावले जात आहेत आणि माझी चिंता करीत आहेत...
०७/१०/२०१८ (रविवार) तारखेला सकाळी मी सहज आवरत असताना मला बाबांनी हॉल आणि बेडरूमला जोडणाऱ्या दरवाजावर थांबून सहजच विचारले की "मुले आली का क्लासला?". मला राग आला कारण आधीच मी माझ्या कामात गुंतलेलो असताना आणि विद्यार्थी मिळत नसल्याने हताश झालो होतो आणि त्यात असा प्रश्न नेहमी विचारला कि मला राग येईचा कारण ते मला चिडवल्यासारखं वाटायचं! मी ओरडलो त्यांना! मला खरच माहित नव्हतं कि त्यांना या गोष्टी फार दुखावतील म्हणून! मला कळलेच नाही.
संध्याकाळी मात्र जेव्हा त्यांनी भरपूर दारू पिली. त्यावेळी ते मला वेगळ्याच पद्धतीने बोलत होते... पण १००% त्यांनी आज जी दारू प्यायली ती इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणातच होती!
मला आठवतं कि त्यांनी दारू पिल्यावर आईला बोंबील करण्याची विनंती केली होती पण आईने नाकारलं. मला खूप भूक लागल्याने मी लगेच जेवायला बसलो... माझ्यासाठी अंड्याची पोळी आईने केली... टीव्ही सुरू होता.. मी हॉल मध्ये चटईवर बसलो होतो आणि हॉलच्या खिडकी आणि दरवाजाच्या मधल्या भिंती समोर मधोमध बसलो होतो...
आईचा स्वयंपाक सुरूच होता.. बाबा बेसिन जवळ उभे होते आणि अचानक संडासला जाऊन आले... त्यांना त्रास होत होता हे जाणवत होतं मात्र दारूमुळे होत आहे असे गृहीत धरून मी दुर्लक्षित केले तरी आईचे अधूनमधून लक्ष होते... त्यांनी मधेच मला मम्मीकडून केलेली भाजी आणण्यास सांगितले... (त्या नॉनव्हेज भाजी बद्दल मी त्यांना माहिती दिली होती जेव्हा ते व्यवस्थित होते तेव्हा!) म्हणून मी ठीक आहे आणतो असे म्हणालो आणि त्यांनी मला आत्ता नको आणू जेवण झाल्यावर जा असे सांगितले!
नंतर मी टीव्ही पाहण्यात तसेच जेवण्यात मग्न होतो.. त्यातच बाबा अचानक बाहेर गेले आणि बराच वेळ झाला आईला कसलातरी संशय आल्याने ती मला विचारू लागली बाबा कुठे आहेत. मी म्हटलं आहेत गेट जवळ! आईला राहवेनाच ... ती हातात पिठाचा गोळा तसाच घेऊन पाहायला आली आणि मोठ्याने ओरडू लागली... बाबांनी गेट जोरात धरून ठेवले होते ... आई मला आवाज देऊ लागली... आई घाबरली होती... बाबा गेट सोडत नव्हते आणि आई त्यांना घरात ओढत होती... कसेबसे बाबा भानावर आले आणि घरात आले मात्र ते पुन्हा संडासाच्या दिशेने गेले... आईने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला... त्यांनी ऐकलं नाही... आई म्हटली मी मदत करते...  पण त्यांनी ऐकलं नाही... आई सोफ्यावर बसून चिंता करू लागली... मी सुद्धा या वेळी थोडा घाबरलो होतो... बाबांनी बराच वेळ लावला... मधेच आईने दार वाजवून त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले... आणखी काही वेळाने ते बाहेर आले आणि आमच्या जीवात जीव आला! मग ते लगेच दुसऱ्या एका लाकडी सोफ्यावर लेटले...
काही कालावधी उलटल्यानंतर मी भाजी आणायला मम्मीकडे आलो. भाजी घेऊन घरी आलो तेव्हा सुनील काका आणि स्वाती काकी घरात आले होते. ते सहजच आले होते मात्र त्यांचा विषय जेव्हा दिदीच्या लग्नाचा निघाला तेव्हा बाबा म्हणू लागले की तिला पुण्यातच द्यायचे! नंतर बाबांना जेवण्यासाठी आईने ताट वाढले. बाबांनी व्यवस्थित जेवण केलं नाही आणि सुनीलकाकांना त्यांनी जेवणाचा आग्रह केला आणि जेव्हा सुनीलकाका घास न घास खाऊ लागले तेव्हा बाबा त्यांना पाहून खूप खुश आणि समाधानी झाल्याचे दिसत होते आणि तसे ते शब्दांत देखील स्पष्ट करीतच होते... सहज आठवण आली म्हणून एक फोन पियूताईला (माझ्या आत्याची मुलगी) करून सगळे तिच्याशी बोलले. त्यात काकांनी मला सहज विचारले क्लास बद्दल तेव्हा मी त्यांना शांतपणे तेच खोटे उत्तर दिले (२०० - २५०) आणि तेव्हा बाबांचे मन फारच दुखावले गेले! [माझं म्हणणं वेगळं होतं... बाबांना उत्तर न देणे आणि इतरांना देणे असे काहीच नव्हते... वेळ, प्रसंग, माझ्या मनाची स्थिती, इत्यादींमुळे मी असा वागलो... अर्थात जर बाबांनी सुद्धा निवांत क्षणी हा प्रश्न केला असता तर मी त्यांना व्यवस्थितच उत्तर दिले असते यात शंका नसावी!]
नंतर बाबा सुनीलकाकांबद्दल चिंता करू लागले आणि त्यांचे गुणगान करू लागले... तेव्हा आई म्हणू लागली की असे एकाची काय बाजू घेता राजुने काही केलं नाही का? अचानक मधेच म्हणाले थोडा भात घे, भाजी घे... काकांना घ्यावेच लागले... पण मग अजूनच खुश झाले (बाबा) आणि वेगळाच समाधानी चेहरा! त्यात ते बोलले सुद्धा - "आता मी समाधानी झालो... आता काही राहीलं नाही माझं... मी आता उद्या राहत नाही..."
या वाक्याला थोडं गांभीर्याने मी पाहिले परंतु इतरांनी त्यांच्या या वाक्याची मस्करी केली!